सांजवार्ता विशेष : दसरा झाला आता दिवाळीत तरी वाढवा रेल्वेची संख्या, नेहमीच असते वेटिंग; रेल्वेला गर्दी लक्षात घेऊन वाढवा डब्बे

Foto
उज्ज्वला साळुंके

छत्रपती संभाजीनगरः सण उत्सवाचा काळात सर्वाधिक नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करतात. त्यातल्या त्यात दसरा, दिवाळीच्या काळात सर्वाधिक प्रवाशी रेल्वेने प्रवास करतात. मात्र अशावेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या रेल्वेला गर्दी वाढलेली असते. आता दसरा सणामुळे देखील बऱ्याच रेल्वेला गर्दी पाहायला मिळाली. आता दसरा सण झाला. दिवाळी उत्सवाची तयारी सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे किमान दिवाळीत तरी रेल्वेची संख्या वाढवा. रेल्वेला गर्दी लक्षात घेऊन त्या ठिकाणी वाढीव डब्बे किंवा रेल्वे वाढविण्यासाठी विचार व्हावा अशीही मागणी आता प्रवाशीवर्गाकडून केली जात आहे.

सण उत्सव काळात रेल्वेला अनेकजण महिना महिना अगोदर बुकिंग करूनही वेटिंगलिस्ट मध्ये त्यांना राहावे लागते. परंतु असे असूनही अशा काळात ना रेल्वेची संख्या वाढते, ना रेल्वेचे डब्बे. नेहमीच प्रवाशी त्रस्त असतात. याकडे लक्ष देणार कोण? असाही प्रश्‍न वारंवार उपस्थित केला जातो. मात्र असे असतानाही बऱ्याच रेल्वेला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. रेल्वेची संख्या पाहता प्रवाशांच्या तुलनेत रेल्वेची संख्या वाढलेली नाही. किमान सण उत्सव काळात तरी वाढीव रेल्वे देण्याची गरज आहे. एकतर आधीच बऱ्याच ठिकाणी रेल्वे नाहीत. त्यात दरवर्षी सण उत्सव काळात नेहमीच रेल्वेला गर्दी दिसून येते.

दिवाळीत वाढीव डब्बे देणार का?

यावर्षी देखील सण उत्सव काळात अशीच गर्दी राहू शकते. सध्या गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सव काळात देखील मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वे फुल्ल होत्या. आता नवरात्रोत्सव आणि दसरा साजरा झाला. त्यातही रेल्वेला प्रवाशांची गर्दी होतीच. तसेच दिवाळी सण तोंडावर आहे. सर्वत्र तयारी देखील सुरू झाली आहे. अनेकांनी बाहेर गावी नातेवाईकांकडे तसेच कामानिमित्त शहरात आलेल्या नागरिकांनी दिवाळीसाठी बाहेरगावी जाण्यासाठी नियोजन करणे सुरू केले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रेल्वेला गर्दी आहे त्या ठिकाणी तरी किमान रेल्वेची संख्या वाढविली पाहिजे. एकतर खासगी ट्रॅव्हलचे दर पाहिले तर सण उत्सव काळात जणू गगनाला भिडले की काय? असा प्रश्‍न उपस्थित होतो. सर्वसामान्यांना ते तिकीटदर परवडणारे देखील नाही. अशातच रेल्वेने प्रवास करणे हेच सर्वसामान्य प्रवाशांना सोयीस्कर वाटते. त्यासाठी किमान सण उत्सव काळात रेल्वे विभाग रेल्वेची संख्या किंवा वाढीव डब्बे देणार का? असाही प्रश्‍न आता प्रवाशी वर्गाकडून उपस्थित होत आहे.

या रेल्वेला नेहमीच गर्दी 

दसरा असो किंवा दिवाळी असो मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. सण उत्सव काळात रेल्वेने प्रवास करण्यावर अनेकजण भर देतात. मात्र त्यातही त्यांना बसायलाही जागा मिळत नाही. जनशताब्दी एक्क्सप्रेस, नंदीग्राम एक्क्सप्रेस, देवगिरी एक्क्सप्रेस, तपोवन एक्क्सप्रेस, अजिंठा एक्क्सप्रेस या रेल्वेला नेहमीच गर्दी पाहायला मिळते. तत्काळ तिकीट काढूनही अनेकांना उभे राहूनच बऱ्याचदा प्रवास करावा लागतो. अनेकजण महिना महिना अगोदर तिकीट काढून ठेवतात. परंतु त्यांना तिकीट कन्फर्म होण्याची प्रतीक्षा करावी लागते. मुंबईच नव्हे तर दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेला देखील नेहमीच वेटिंग असते. याशिवाय यात हैदराबाद, नांदेडकडे जाणाऱ्या रेल्वेला देखील सण उत्सव काळात गर्दी पाहायला मिळते. तिरुपती एक्क्सप्रेस आणि शिर्डी साईनगर या रेल्वेला देखील वेटिंगवर वेटिंग पाहायला मिळते. त्यामुळे किमान सण उत्सव काळात तरी रेल्वेची संख्या किंवा वाढीव डब्बे द्यावेत अशीही मागणी केली जात आहे.